मलेशियन विमान हल्ला : नरेंद्र मोदींचंही विमान होतं 'त्याच' मार्गावर

मलेशिअन एअरलाईन्सच्या ज्या विमानावर ‘बक मिसाईल सिस्टम’च्या साहाय्यानं हल्ला करण्यात आला त्याच विमानाच्या मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान होतं, अशी माहिती आता समोर आलीय. 

Updated: Jul 18, 2014, 05:58 PM IST
मलेशियन विमान हल्ला : नरेंद्र मोदींचंही विमान होतं 'त्याच' मार्गावर title=

नवी दिल्ली : मलेशिअन एअरलाईन्सच्या ज्या विमानावर ‘बक मिसाईल सिस्टम’च्या साहाय्यानं हल्ला करण्यात आला त्याच विमानाच्या मागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान होतं, अशी माहिती आता समोर आलीय. 

मलेशियन एअरलाइन्सच्या या विमान ‘बोईंग 777’ एमस्टर्डमहून कुआलालांपूर जात होतं. यामध्ये 280 प्रवासी आणि चालक दलातील 15 सदस्य उपस्थित होते. पण, या विमानावर झालेल्या हल्ल्यामुळे यातील एकही उपस्थित जिवंत वाचू शकला नाही. याच विमानाच्या मार्गावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही विमान जाणार होतं. पण, त्याआधीच या विमानहल्ल्याचं वृत्त समजलं... आणि त्यानंतर मोदींचं विमान कोणत्या मार्गाने भारतात आणायचं, असा प्रश्न सुरक्षा यंत्रणांसमोर निर्माण झाला होता. मात्र, तासाभरानं परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर युक्रेनच्या हवाई हद्दीतून हे मोदींचं विमान भारतात दाखल झालं.  

मोदी ब्रिक्स  देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर होते. ते प्रवास करत असलेले ‘एअर इंडिया’चं विमान फ्रँकफर्टहून सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी निघालं. डोनेस्क (जेथे मलेशियाच्या विमानावर हल्ला झाला) तिथं पोहोचण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतो. म्हणजे त्याच्या एका तासानंतर मोदींचे विमान, युक्रेन फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजन (FIR) मधून जाणार होतं. 

युरोपच्या सर्व फ्लाइट्स दोन एअर कॉरिडोरचा वापर करतात. त्यात युक्रेन फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन आणि सिम्फरपोल फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजन यांचा समावेश आहे. 3 एप्रिलला युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजेंसीने एका सेफ्टी बुलेटिनमध्ये सिम्फरपोल एअरस्पेसमध्ये विमानप्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच सर्व फ्लाइट्स इन्फॉर्मेशन रीजन (FIR) चा वापर करतात. तेथूनच मोदींचे विमान जाणार होते. पण, हल्ल्याचं वृत्त समजल्यानंतर, विमान रशियाच्या हवाई हद्दीतून न्यायचं की काळ्या समुद्रावरुन, असा पेच वैमानिकांना आणि सुरक्षा यंत्रणांसमोर पडला होता. अखेरीस युक्रेन हवाई हद्दीतून विमान भारतात आले.

महत्त्वाचं म्हणजे, ‘बक मिसाईल सिस्टम’च्या साहाय्यानं 50 फूटांपासून ते 72,000 फूटांच्या उंचीपर्यंत आपल्या लक्ष्याला निशाणा बनविलं जाऊ शकतं... आणि याच सिस्टमचा वापर मलेशिअन एअरलाईन्सच्या विमानावर हल्ला करण्यासाठी करण्यात आल्याचं उघड झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.