www.24taas.com, झी मीडिया, त्रिचरापल्ली
एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची दक्षिण भारतात आज पहिल्यांदा रॅली निघणार आहे. या रॅलीत तुम्हालाही सहभागी होण्याची इच्छा असेल तर मात्र तुम्हाला १० रुपये भरावे लागणार आहेत. बुधवारी भाजपच्या कार्यकर्ता महाकुंभ मेळाव्यात गर्जना केल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज या रॅलीत सहभागी होतील.
आत्तापर्यंत नेत्यांच्या रॅलीमध्ये गर्दी जमा करण्यासाठी नेतेमंडळी लोकांना पैसे वाटत असताना तुम्ही पाहिले असतील पण आज मोदी मात्र आपल्या रॅलीत सहभागी करून घेण्यासाठी लोकांकडून पैसे घेताना दिसतील. ही रॅली तामिळनाडूच्या चार प्रमुख शहरांपैंकी एक असलेल्या त्रिचरापल्लीमध्ये होईल. पुनमलई भागातील गोल्डन रॉक रेल्वे ग्राऊंडमध्ये ही रॅली आयोजित करण्यात येईल. या रॅलीत मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
या रॅलीमध्येही युवकांची गर्दी जमा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तामिळनाडूच्या प्रत्येक भागातून पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक या रॅलीत सहभागी होतील याची काळजी घेण्यात येतेय. यासाठी महिनाभर अगोदरपासून एक खास पोर्टल बनवून ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. आणि हीच सगळी प्रक्रिया मोदींच्या हैदराबाद रॅलीच्या वेळीही पार पाडण्यात आली होती. हैदराबाद रॅलीत सहभागी होण्यासाठी ५ रुपयांची फी स्वीकारली गेली होती पण इथं मात्र ही फी दुप्पट म्हणजे १० रुपये करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.