विलासरावांची जागा घेणार राणे? राणेंची दिल्लीवारी सुरू?

दिल्लीत नव्या राजकारणाला आता वेग येऊ लागला आहे. विलासरावांचे निधन, तृणमूलने काँग्रेसची साथ सोडणं. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.

Updated: Sep 24, 2012, 01:29 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत नव्या राजकारणाला आता वेग येऊ लागला आहे. विलासरावांचे निधन, तृणमूलने काँग्रेसची साथ सोडणं. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे. सहा मत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ती रिक्त मंत्रीपदं भरणे गरजेचं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील वजनदार असं व्यक्तिमत्व असणारे विलासराव यांच्या निधनानंतर त्यांची जागा कोण घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र नारायण राणे याचं पारडं जड वाटतं आहे. त्यामुळे रावांची जागा दादा घेणार का याकडेच सारे डोळे लावून बसले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात व काँग्रेस पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होत आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळात अनेक जागा रिक्त असून, २८ सप्टेंबरनंतर कधीही फेरबदल होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते व रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांच्यासह ६ मंत्र्यांनी राजीनामे दिली आहेत. ऊर्जा मंत्रालय, रेल्वेमंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री, दूरसंचार मंत्रालय यासारखी महत्त्वाची मंत्रालये रिक्त आहेत. काँग्रेस पक्ष संघटनेतही मोठे बदल होणार आहेत.
राहुल गांधी यांना पक्षात सोनिया गांधी यांच्यानंतरचे पद मिळू शकते. त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद दिले जावू शकते. काँग्रेसकडून राज्यातील मातब्बर नेते व उद्योगमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मोठी संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.