www.24taas.com, नवी दिल्ली
डिझेल दरवाढ आणि रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीच्या केंद्रसरकारच्या धोरणाला भाजपचा विरोध असला तरी पक्षाचे वरिष्ठनेते अरूण शौरींनी मात्र या निर्णयाचं समर्थन करत भाजपला घरचा आहेर दिलाय.
केंद्र सरकारने घेतलेले निर्णय ही काळाची गरज असल्याचं शौरींनी म्हटलंय. डिझेल दरवाढ ही आवश्यकच होती तसेच रिटेलमध्ये एफडीआयला परवानगी दिल्याने देशाचा फायदाच होईल असा विश्वास शौरी यांनी व्यक्त केलाय. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रथमच आपली निर्णय घेण्याची क्षमता दाखवून दिली असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलंय. तसच सध्या सुरू असलेला आकांडतांडव निरर्थक असल्याचं शौरी यांनी म्हटलंय.
भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी. सी. खांडुरी यांनीही भाजपाला घरचा आहेर देत पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणी निष्फळ असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या राजीनाम्याने काहीच साध्य होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराच्या रोगावर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी इलाज करायला हवा असं ते म्हणाले.