माझ्या मुलाचं शिर परत घेऊन या; दुर्दैवी मातेचा टाहो

भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेच्याजवळ दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला दोन भारतीय जवान बळी पडले. या हल्ल्यात शहिद झालेल्या हेमराज सिंग याच्या आईनं आपल्या मुलाचं धडावेगळं झालं असलं तरी शिर पाहायची इच्छा व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 10, 2013, 04:31 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेच्याजवळ दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला दोन भारतीय जवान बळी पडले. या हल्ल्यात शहिद झालेल्या हेमराज सिंग याच्या आईनं आपल्या मुलाचं धडावेगळं झालं असलं तरी शिर पाहायची इच्छा व्यक्त केलीय.
‘माझ्या मुलाचं धडावेगळं झालेलं शिर परत घेऊन या... त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही’ असं म्हणत या मातेनं टाहो फोडला. हेमराज सिंह यांच्या पार्थीवावर बुधवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. हेमराज यांच्या केवळ पाच वर्षांच्या मुलानं त्यांना मुखाग्नि दिला. मुळचे मथुरेचे लान्स नायक हेमराज सिंह हरियाणाजवळच्या एका छोट्या गावातून सैन्यात भरती झाले होते.

पाकिस्तानच्या या विश्वासघातकी हल्ल्यात बळी पडलेल्या दोन जवानांचं धड सीमेवर रक्तबंबाळ अवस्थेत सापडलं होतं. दोघांचेही मुंडके धडावेगळे केले गेले होते. त्यातील हेमराज यांचं धडावेगलं करण्यात आलेलं शिर अजूनही सापडलेलं नाही. पाकिस्तानी हल्लेखोर हे शिर आपल्यासोबत घेऊन गेल्याची शक्यता डेप्युटी कमांडर जे.के.तिवारी यांनी व्यक्त केली होती.