www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय. हरियाणमध्ये यमुनेच्या पाण्यात वाढ झाल्यानं इथं काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीनं चिंतेत वाढ झालीय. आत्तापर्यंत ६० जण या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेत तर शेकडो जण पुराच्या पाण्यात अडकून पडलेत.
उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातलयं. गेल्या ४८ तासांपासून न थांबलेल्या पावसानं थैमान घातलंय. राज्यातल्या सर्व नद्यांना महापूर आलाय. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. याचा फटका उत्तर काशीतल्या पर्यटकांनाही बसलाय. महाराष्ट्रातून काशीत गेलेले भाविकही या ठिकाणी अडकले आहेत. नाशिकमधून ७० भाविक, औरंगाबादमधून १७ जण तर लातूरचे 6 जण उत्तर काशीला गेलेले आहेत. हे सर्व भाविक संकटात सापडले आहेत. या पर्यटकांमध्ये बहुतांशी वृद्ध असल्यानं, अनेक अडचणी येतायत. ‘झी २४ तास’नं नाशिकचे भाविक दत्तात्रय सोनजे यांच्याशी संपर्क साधला असता शासनाकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिलीय. महाराष्ट्र सरकारनं उत्तर प्रदेश शासनाशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
ऋषिकेशमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांना मोठा पूर आलाय. निसर्गाच्या रुद्रावतारापुढं देवाचंही काही चालेना, असंच चित्र पाहायला मिळालंय. ऋषिकेशमध्ये भलीमोठी शंकराची मूर्तीही नदीच्या पाण्यात वाहून गेलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.