www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सगळेजण उत्सुकतेने वाट पाहात असलेला मान्सून आज केरळात दाखल झाला. दुष्काळ तसंच उकाड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात तो आता कधी येतोय याचीच वाट सगळेजण चातकाप्रमाणे पाहतायत.
मान्सून केरळात दाखल झालाय. आणि तोही अगदी आपल्या टाईम टेबलनुसार. मान्सूनच्या पहिल्या शिडकाव्याचा आनंद केरळवासियांनी मोठ्या आनंदाने घेतला. तिरुअनंतपुरमसह अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली.
केरळमध्ये वेळेत हजेरी लावल्याने देशभरातील टाईमटेबलही मान्सून पाळेल, ही आशा वाढलीय. पण महाराष्ट्राला आणखी काही काळ मान्सूनची प्रतिक्षा करावी लागेल. सात जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सून वेळेवर आल्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील गरमीने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर महागाईचा भडकाही कमी होण्याची शक्यता आहे. कारण चांगल्या पावसामुळे पीकपाणी चांगलं होण्याची चिन्हं आहेत. मान्सूनचे चार महिने हे तांदूळ, डाळी, सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या पिकासाठी महत्त्वाचे असतात. देशातील ६० टक्के पीकं ही मान्सूनवर अवलंबून असतात. मान्सूनच्या केरळमधील आगमनामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळालाय. आता प्रतिक्षा आहे ती त्याच्या महाराष्ट्र प्रवेशाची.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.