नवी दिल्ली : ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’अशा स्वत:च्या पूर्ण नावाच्या उभ्या पट्ट्या कापडातच विणून घेऊन शिवलेल्या वादग्रस्त कोटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या आठ महिन्यांच्या काळात देश-विदेशातून मिळालेल्या भटवस्तूंचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यातून मिळणारा निधी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गंगा शुद्धीकरण योजनेसाठी दान करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
सूत्रांनुसार मोदी यांना पंतप्रधान या नात्यानं आतापर्यंत ४५५ भेटवस्तू मिळाल्या आहेत. या वस्तू जनतेला पाहण्यासाठी उद्यापासून तीन दिवस म्हणजे १८, १९ आणि २० फेब्रुवारी रोजी सूरतमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात येतील आणि त्यांचा जाहीर लिलाव केला जाईल.
गडद निळ्या रंगाचा हा कोट मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या शिखर बैठकीच्या वेळी घातल्यानं चर्चेत आला होता. या कोटाची किंमत १० लाख रुपयांच्या घरात आहे. एवढ्या महागड्या कोटाचं मोदींनी जागतिक माध्यमांचं लक्ष्य असलेल्या प्रसंगी जाहीर प्रदर्शन करावं, यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर खरपूस टीका झाली होती.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी ही परंपरा सुरू केली आणि आता पंतप्रधान झाल्यावरही ती पुढे सुरू ठेवणार आहेत. २००१ ते मे २०१४ या काळात मुख्यमंत्री या नात्यानं मोदी यांना एकूण १८,७१० भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यांचा दरवर्षी लिलाव केला जायचा. त्यातून मिळालेला एकूण १९ कोटी रुपयांचा निधी गुजरात सरकारच्या मुलींच्या शिक्षणाच्या ‘कन्या केलवणी योजने’साठी दिला होता.
सूत्रांनुसार आता मोदी लोकसभेत वाराणसी या हिंदूंच्या सर्वाधिक पवित्र तीर्थक्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी वाराणसीला जाऊन गंगा आरतीही केली होती. त्यांच्याच आग्रहाखातर गंगा शुद्धीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना आखून त्यासाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालयही तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून मिळालेल्या भेटवस्तूंचा उपयोग या कामासाठी करण्याचं मोदी यांनी ठरविलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.