www.24taas.com,नवी दिल्ली
२०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी सध्यातरी नाकारण्यात आली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनी विचार विनिमय केल्यावर हा निर्णय घेतला आहे.
जर नरेंद्र मोदींना पतंप्रधानपदासाठी उमेदवार केलं, तर हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता यांसारखेच मुद्दे पुनःपुन्हा उभे राहातील आणि भ्रष्टाचार, महागाई यांसारखे मुद्दे मागे पडतील अशी भीती भाजपने व्यक्त केली आहे. सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंग, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यामद्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि सुरेश सोनी या नेत्यांमध्ये चर्चा झाली.
पंतप्रधान पदाच्या दावेदारीत नरेंद्र मोदी ह योग्य असल्याचं सर्व वरिष्ठांनी मान्य केलंय. मात्र त्यांना पंतप्रधानपदासाठी उभं करण्यासाठी सध्याची राजकीय परिस्थिती योग्य नसल्याचं वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे. याबद्दल मोदींशीही चर्चा करण्यात आली असून नरेंद्र मोदींनीही हे मान्य केलं आहे. मात्र आता भाजपाकडून पंतप्रधानपदाचं दावेदार कोण असेल, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.