मुंबई : भारतीय वायूदलामध्ये लढाऊ विमानांच्या वैमानिक म्हणून महिला अधिकारी आता लवकरच दिसणार आहेत. यासाठी 'एअर फोर्स अकॅडमी'मधल्या (AFA) सध्याच्या बॅचमधूनच महिला अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही माहिती दिली आहे.
उंच आकाशात झेप घेतानाच शत्रूलाही कंठस्नान घालण्याची कामगिरी आता भारतीय महिला बजावणार आहेत. कारण महिला पायलट्सना आता एअरफोर्सच्या फायटींग विंगचे दरवाजेही खुले झालेत. महिला पायलट्स आता चक्क फायटर्स होणार आहेत.
अरूप राहा यांनी 83 व्या एअर फोर्स डेला केलेली ही घोषणा भारतातल्या प्रत्येक महिलेसाठी आनंदाची आणि अभिमानाची ठरलीय. एअरफोर्समध्ये आत्तापर्यंत कार्गो किंवा हेलिकॉप्टर फ्लाईंग करणाऱ्या महिला पायलट्सना आता फायटर पायलटही होता येणार आहे. सुखोई, मिग-29, मिराज, जग्वार यांसारखी भारताच्या ताफ्यातली अत्याधुनिक फायटर एअरक्राफ्ट्सचं सारथ्य, नव्हे त्यांच्या सहाय्याने शत्रूला चारीमुंड्या चीत करण्याच्या संधी आता महिलांना मिळणार आहेत. भारताच्या वायुदलाच्या इतिहासातली ही क्रांतीकारी झेप ठरणार आहे. एअर फोर्सने त्यासाठीचा प्रस्ताव आता संरक्षणमंत्रालयाकडे पाठवला आहे.
खरं म्हणजे महिलांना आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या तीनही संरक्षण दलात फायटींग विंगमध्ये संधी मिळावी, ही मागणी खुप जुनी आहे. मात्र, त्याला सतत विरोध होत होता. फायटर पायलट होण्यासाठी महिलांची शारीरिक क्षमता पुरेशी नाही, असं खुद्द राहा गेल्या वर्षी मार्च महिन्यात म्हणाले होते. मात्र, या विषयावर वायुदलाकडून सातत्याने अभ्यास केला जात होता.
एअर मार्शल भूषण गोखले यांनी त्यांच्या कार्यकाळात याविषयी अभ्यास करून सरकारला काही माहिती सादर केली होती. संरक्षण मंत्रालयाच्या प्रस्तावाला आता सरकारनं परवानगी दिल्यानंतर महिला फायटर पायलट्सच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष फायटर प्लेन फ्लाय करण्यास महिला पायलट्सना किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल.
महिलांना कॉम्बॅट विंगमध्ये संधी देण्याचं पहिलं पाऊल एअर फोर्सनं उचललंय. महिलांना आर्मीमध्येही कॉम्बॅट विंगमध्ये महिलांना संधी देण्याचा विचार असल्याचं सुतोवाच संरक्षणमंत्र्यांनी अलीकडेच केलं होतं. त्याचबरोबर बॉर्डर पेट्रोलिंगसाठी फॉरवर्ड पोस्टवर महिला सैनिकांना तैनात करण्याचं क्रांतीकारी पाऊल याआधीच बीएसएफने उचललं आहे. महिला ही जबाबदारी उत्तमरित्या पारही पाडत आहेत. एअर फोर्समध्येही महिला पायलट्स कार्यरत आहेत. भली मोठी कार्गो विमानं त्या लीलया हाताळत आहेत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अनेक बचावकार्यातही महिला पायलट्सनी उत्तम कामगिरी केलीय. त्यामुळे आता फायटर पायलट म्हणून मिळालेली संधी महिला उत्तम रितीने पार पाडतील यात शंकाच नाही. महिलाशक्तीसाठी हे ख-या अर्थानं सीमोल्लंघन आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.