नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या इंडिया गेटपासून बेपत्ता झालेली ३ वर्षीय चिमुकली जान्हवी रविवारी संध्याकाळी पोलिसांना सापडली. २८ सप्टेंबरला जान्हवी इंडिया गेटहून बेपत्ता झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना जान्हवी जनकपूरीच्या डी. ब्लॉकमध्ये सापडली. जान्हवीचे मामा श्याम ग्रोवर आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिलीय. जान्हवीची ओळख लपविण्यासाठी तिला टकलं केलं गेलं होतं.
रविवारी दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी जान्हवीची माहिती देणाऱ्याला ५० हजार रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली होती. मुलीच्या कुटुंबियांना भीती होती की, तिचं अपहरण झालंय. पोलिसांनी टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक तक्रार दाखल केली होती आणि गुन्हे शाखा आणि विशेष कृती दलाची टीम तिचा शोध घेत होते. जान्हवीच्या कुटुंबियांनी रात्री इंडिया गेटवर प्रदर्शन पण केलं होतं. जिथून पोलिसांनी त्यांना जंतर मंतरवर पाठवलं.
रघुवीर नगरमध्ये राहणारे राकेश आहुजा २८ सप्टेंबरला रात्री इंडिया गेटवर फिरायला गेले होते. सोबत पत्नी, दोन धाकटे भाऊ, काका आणि आत्यासह दोन लहान मुलं होते. इंडिया गेटच्या लॉनमध्ये जान्हवी कुटुंबातील इतर मुलांसोबत खेळत होती. रात्री ९.३०वाजता राकेश यांच्या लक्षात आलं की, जान्हवी दिसत नाहीय. सर्वांनी सगळीकडे शोधलं पण ती सापडली नाही. मग त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.