www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार आणि मुंबईतील ‘शक्ती मिल’ सामूहिक बलात्कार करणातील साम्य म्हणजे या दोन्हीही गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आढळला होता. त्यानंतर कायद्यामध्ये सुधारणा व्हायला हवी, अशी मागणी तीव्रतेनं पुढे आली. यामुळे, आता महिला व बालकल्याण मंत्रालयानं बलात्कार आणि खुनासारख्या गुन्ह्यांत अल्पवयीन आरोपी संदर्भातील कायद्यात बदल करण्याचा एक प्रस्ताव तयार केलाय.
या प्रस्तावात अल्पवयीन आरोपीलाही प्रौढ ठरविण्याच्यादृष्टीनं कायद्यात बदल करण्यात यावेत, असं म्हटलं गेलंय. पुढच्या काही दिवसांत या प्रस्तावाला मूर्त स्वरुप येईल. महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या या प्रस्तावानुसार, बलात्कार आणि खुनासारख्या अघोरी गुन्ह्यांत १६ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या अल्पवयीन आरोपीचा समावेश असेल तरी त्याला प्रौढ ठरविण्यात यावं, असं म्हटलं गेलंय. मंत्रालयाचा हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत १६ ते १८ वर्षे वयादरम्यानच्या अल्पवयीन गुन्हेगाराला संरक्षण नाकारले जाईल. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अल्पवयीन आरोपीचं वय १८ वर्षांपेक्षा कमी करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळल्या होत्या.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.