www.24taas.com, वॉशिंग्टन
मध्यमवर्गीय महिला आणि तरुणी आपल्या आरोग्यापेक्षा सौंदर्याक़डे आणि फिगरक़डे जास्त लक्ष देऊ लागले असल्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढत असल्याचं वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. मोदींच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
`वॉल स्ट्रीट जर्नल` या प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्राला मुलाखत देताना मोदी म्हणाले, मध्यमवर्गीयांमध्ये आपल्या शरीरायष्टीबद्दल सजग होणं हे गुजरातमधील कुपोषणाचं मुख्य कारण आहे. गुजरात हे शाकाहारी लोकांचं राज्य आहे. गुजरातमध्ये मध्यमवर्गीय लोक अधिक आहेत. आता मध्यमवर्गीय लोकांना आरोग्यापेक्षा सौंदर्याचीच जास्त काळजी वाटू लागली आहे. परिणामी कुपोषण वाढलं असल्याचं मोदींनी सांगितलं. यासंदर्भात मोदी म्हणाले, “मध्यमवर्गीय कुटुंबात आई मुलीला दूध पिण्यास सांगते, तेव्हा मायलेकीत वाद होतो. कारण मुलीला दूध मिण्याने आपण जाडे होऊ, अशी भीती असते. मध्यमवर्गात अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलणं हे आमच्यापुढील आव्हान आहे.”
गोध्रा हत्याकांडाबद्दल माफी मागणार नाही
गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतरच्या दंगलीबद्दल मोदींना विचारलं असता मोदी म्हणाले, या संदर्भात माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपली चूक असेल, तर आपण माफी मागतो. माझ्या हातून चूक झालेलीच नाही, तर माफी का मागू? माफीच मागायची असती, तर गेल्या १० वर्षांत १० हजार मुलाखती देऊन मागितली असती. पण मी गुन्हेगार नसताना का माफी मागू? असं मोदी म्हणाले