भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच - पंतप्रधान

मनकी बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बळीराजाशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी दिलासा दिला. 

Updated: Mar 22, 2015, 10:06 PM IST
भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच - पंतप्रधान title=

नवी दिल्ली: मनकी बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बळीराजाशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी दिलासा दिला. महाराष्ट्रात झालेल्या गारपिटीचाही यावेळी पंतप्रधानांनी आवर्जून ऊल्लेख करत गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी बळीराजाला दिलं.  

शिवाय भूमी अधिग्रहण विधेयाविषयी देखील पंतप्रधानांनी संवाद साधला. विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं असून विरोधकांकडून याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. या संपूर्ण कार्यक्रमात मोदींचा भर भूसंपादन विधेयकावर होता. भूसंपादन कायदा १२० वर्ष जून असून जी लोकं आता शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून बोलत आहेत. त्या लोकांनीही याच कायद्यानुसार राज्य केलं असं सांगत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला. 

भूसंपादनासोबतच भारतात १३ असे कायदे आहेत ज्यात भूमी अधिग्रहण करता येते, यात रेल्वे, खाण आणि राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे, असं मोदींनी निदर्शनास आणून दिलं. भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांचे हित साधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मोदींनी स्पष्ट केलं. 

नवीन विधेयकात भूसंपादनात शेतकऱ्यांना चार पट नुकसान भरपाई मिळेल, याशिवाय तिथं औद्योगिक कॉरिडोर झाल्यास गावातील तरुणांना रोजगारही मिळू शकेल, प्रकल्पासाठी जागा देणाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळेल, असं आश्वासन मोदींनी दिलं आहे.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.