मुंबई : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरीप्रकरणी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. ऑगस्टाबाबत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. मात्र केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अशा सूचना उपसभापतींनी स्वामींना दिल्या.
काँग्रेसला बदनाम करण्यासाठी हा खोटा प्रचार सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला. तत्पूर्वी या लाचखोरी प्रकरणाचा तपशील युपीएनं द्यावा अशी मागणी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. हेलिकॉप्टर खरेदीच्या करारात लाचखोरी झाल्याचं उघड झालयं. याप्रकरणी इटलीतल्या मिलान अपील कोर्टानं तिघांना दोषी ठरवून शिक्षा सुनावलीय. पण या तिघांनी भारतात नेमकी कुणाला लाच दिली हे अजून सिद्ध झालेलं नाही.
आज माजी एअर चीफ मार्शल एस.पी त्यागी यांची चौकशी पुन्हा सुरूच राहणार आहे. एस.पी त्यागी यांनी फिनमेकानिका या हेलिकॉप्टर खरेदीसंदर्भात इटलीत जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं कबुल केलंय. त्यामुळे लाचखोरीचा संशय आणखी गडद होत चाललाय.