लखनऊ: भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ उत्तरप्रदेशमधील उन्नाव इथले खासदार साक्षी महाराज यांनीदेखील नवीन वाद निर्माण केला आहे. मदरसांमध्ये राष्ट्रप्रेमाऐवजी फक्त दहशतवादाचेच धडे दिले जातात, असं विधान साक्षी महाराज यांनी केलंय.
उत्तरप्रदेशमधील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या साक्षी महाराज यांनी थेट मदरसांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणावरच हल्लाबोल केला. मदरसांमध्ये दहशतवादाचे धडे दिले जात असून तिथं फक्त कुराणाचं शिक्षण दिल्यास दहशतवादी आणि जिहादी तयार होऊ शकतात आणि हे राष्ट्रहितासाठी चांगलं नाही, असं साक्षी महाराज यांनी सांगितलं.
उत्तरप्रदेशमधील अनेक शाळांना सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नसताना राष्ट्रप्रेमाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या मदरसांना आर्थिक मदत दिली जाते, असं निदर्शनास आणून देत त्यांनी सत्ताधारी अखिलेश यादव यांच्या सरकारवर टीका केली.
साक्षी महाराज यांच्या विधानाचा समाजवादीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी कडाडून विरोध केला. साक्षी महाराज यांचे विधान निंदनीय असून या विधानातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं चौधरी यांनी सांगितलं. कोणताही धर्म दहशतवादाला समर्थन देत नाही. साक्षी महाराज यांनी इस्लाम आणि मदरसांना दहशतवादाशी जोडणं हे निषेधार्हच आहे, असं चौधरी यांनी नमूद केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.