www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपचा `झाडू`च कारणीभूत ठरला... आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर... अरविंद केजरीवाल...
तेरा जादू चल गया... आणि दिल्लीत आम आदमी पार्टी का झाडू चल गया... गेल्या 15 वर्षांपासून दिल्लीत तंबू गाडून बसलेल्या शीला दीक्षित सरकारचा अक्षरशः धुव्वा उडाला... गेल्यावेळी 47 जागा जिंकणा-या काँग्रेसला यावेळी साधा दोन अंकी आकडाही गाठता आला नाही.. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाचा करिश्मा किती, हे सांगता येत नसलं तरी `काँग्रेस का हात, आम आदमी के साथ..` ही घोषणा मात्र शब्दशः खरी ठरली... हातात झाडू घेऊन उभ्या राहिलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाची धूळ चारली.. काँग्रेस का हात यावेळी आम आदमी पार्टी के साथ होता...
अवघ्या वर्षभरापूर्वी जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीच्या या यशाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय... आयआयटी खरगपूरमधून मॅकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेणा-या अरविंद केजरीवाल नावाच्या अवलियानं हा चमत्कार घडवला.
आयआयटीमधून `बी.टेक.` झाल्यानंतर ते टाटा स्टीलमध्ये रूजू झाले. 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी भारतीय महसूल सेवेची परीक्षा दिली. 1995 मध्ये ते भारतीय महसूल सेवेत आयकर खात्यात रूजू झाले. परंतु तिथंही त्यांचा जीव रमला नाही. फेब्रुवारी 2006 मध्ये आयकर सह आयुक्तपदाचा राजीनामा देऊन त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी चळवळ हाती घेतली. 2006 मध्येच प्रतिष्ठेचा मॅगसेसे पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आली. या पुरस्काराची रक्कम त्यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन या एनजीओला दान केली...
याच एनजीओच्या माध्यमातून केजरीवाल यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना सोबत घेऊन भ्रष्टाचाराविरूद्ध व्यापक जनआंदोलन छेडले.. जनलोकपाल विधेयकासाठी केजरीवाल व हजारेंनी हातात हात घालून भ्रष्टाचाराविरूद्ध एल्गार पुकारला.. परंतु 26 नोव्हेंबर 2012 रोजी केजरीवालांनी आम आदमी पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि अण्णा हजारेंनी त्यांच्याशी फारकत घेतली...
आम आदमी पार्टीला आशीर्वाद देण्यासाठी अण्णांनी हात आखडता घेतला.. पण त्यामुळे केजरीवाल यांच्या महत्त्वाकांक्षेला मुरड पडली नाही.. दिल्लीतील काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारच्या विरोधात त्यांनी सर्वच्या सर्व 70 जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे केले. केजरीवाल स्वतः नवी दिल्ली मतदारसंघातून शीला दीक्षित यांच्या विरोधात झाडू घेऊन उभे ठाकले... केजरीवाल आणि कंपनीची ही कसरत अखेर कामी आली.. दिल्लीच्या सुजाण मतदारांनी व्हाइट कॉलर उमेदवारांना भरभरून मतं दिली आणि दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून केजरीवाल्यांच्या आपचा उदय झाला...
शीला दीक्षितांची खुर्ची खेचण्याचं काम केजरीवालांनी केलं, परंतु ते स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसू शकले नाहीत... तसे झाले असते तर 1983 साली आंध्र प्रदेशात काँग्रेसचा धुव्वा उडवणा-या एन.टी. रामाराव यांच्या पराक्रमाची पुनरावृत्ती झाली असती... पण ते झाले नाही. आपच्या जागा वाढल्या, परंतु सत्ता मात्र भाजपची आली.. मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर... अशीच शेवटी आम आदमी पार्टीची अवस्था झाली...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.