www.24taas.com, झी मीडिया, तिरुअनंतपूरम
तुमच्या हातात कोल्ड्रिंक असेल आणि पिता पिता त्यात तुम्हाला मेलेला साप दिसला आढळला तर... कल्पनाही किळसवाणी आणि धोकादायक वाटतेय ना! पण, ही घटना खरंच घडलीय. तिरूअनंतपूरममध्ये एका नामांकित शितपेयाच्या टेट्रा पॅकमध्ये मेलेला साप आढळलाय.
तिरुअनंतपुरममध्ये राहणाऱ्या साजिव यांनी आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसाठी आंब्याच्या रसाचं एक टेट्रा पॅक विकत घेतलं होतं. चिमुरडीनं अर्ध पेय संपवल्यानंतर त्या डब्ब्यामध्ये काहीतरी घट्ट पदार्थ शिल्लक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यामुळे त्यांनी त्या पॅकेटमधली ज्यूस खाली ओतून दिला. मुलीच्या आजीला शंका आल्यानं आत काय होतं हे पाहण्यासाठी आजीने हे पॅकेट फोडलं. तेव्हा त्यात कुजलेल्या अवस्थेत एक छोटा साप त्यांना आढळला.
हे पाहून या कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी मुलीला तातडीनं जवळच्या हॉस्पीटलमध्ये हलवलं. एव्हाना या मुलीला थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. पण, हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू केल्यानंतर डॉक्टरांनी मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं.
या कुटुंबानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या पॅकेटवर नमूद केल्याप्रमाणे उत्पादनाचा वापर करण्याचा कालावधी उलटून गेला असल्याचं लक्षात आलं. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
- वृत्तसंस्था
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.