www.24taas.com, नवी दिल्ली
प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांच्या एका विधानानं पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण केलाय. काटजू यांच्या मते, ९० टक्के भारतीय मूर्ख आहेत, अशा लोकांना अगदी सहजपणे आपल्या बाजूने वळवता येऊ शकतं. इतकंच नाही तर काटजू यांना पाकिस्तान हे वैध राष्ट्र आहे असं वाटतंच नाही, देश विभाजनासाठी कोणताही तार्किक आधार नव्हता असं त्यांनी म्हटलंय.
जम्मू-काश्मीर प्रश्नाच्या मुद्द्यावर बोलताना काटजू यांनी, ‘भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्र येणं हेच काश्मीर प्रश्नाचं उत्तर असू शकतं, असं म्हटलंय. काश्मीर प्रश्न हेच भारत आणि पाकिस्तानचं विभाजन होण्यामागे महत्त्वाचं कारण आहे. द्विराष्ट्राच्या सिद्धांतानुसार हिंदू आणि मुस्लिमांनी वेगवेगळं होणं हे काही देश विभाजनाचं तार्किक कारण असू शकत नाही. मी पाकिस्तानला वैध राष्ट्र कधीच मानत नाही कारण मला मुळातच द्विराष्ट्र सिद्धांत मंजूर नाही’ असं म्हटलंय.
१८५७ नंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दुफळी माजविण्यासाठी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले त्याचेच हे परिणाम आहेत, असे सांगून काटजू यांनी देशातील ९० टक्के लोक मूर्ख असून कोणीही त्यांच्यावर राज्य करू शकतो, असं म्हटलंय. १८५७ पूर्वी देशात धार्मिक वाद नव्हता पण आज या देशातील ८० टक्के हिंदू आणि ८० टक्के मुसलमान हे कट्टर धर्मवेडे आहेत. एवढेच नव्हे तर या देशातील सुशिक्षित लोकही जात बघून मतदान करतात, असंही मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.