www.24taas.com, झी मीडिया, डेहराडून
केदारनाथमध्ये आपत्ती आल्यानंतर नागरिक सैरावैरा धावत होते, पण त्यावेळी असे काही लोक होते की मोहाने वेडे होऊन लूटमार करत होते. उत्तराखंड पोलिसांना या आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर एक आठवड्यानंतर हेलिकॉप्टरची वाट पाहणाऱ्या एका व्यक्तीकडून तब्बल ८३ लाख रुपये जप्त केले. चौकशीत समोर आले की, हा पैसा केदारनाथ येथे आलेल्या महापुरानंतर स्टेट बँकेतून गायब झालेल्या ५ कोटी रुपयांपैकी आहे.
स्टेट बँकेच्या इतर पैशाचा तपासाचं काम सुरू असल्याचे उत्तराखंडचे डीजीपी सत्यव्रत बंसल यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, एका व्यक्तीला ८३ लाखांसह अटक करण्यात आली. केदारनाथमध्ये आलेल्या महापुरात स्टेट बँकेची शाखा पूर्णपणे उध्वस्त झाली. बँकेतील रुपये वाहून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली, आणि तिथे असलेल्या लोकांनी खिसे आणि पिशव्या भरण्यास कोणताही विलंब केला नाही. हे थोडे होते की काय मंदिराच्या तिजोरीवरही हात साफ केले.
उखीमठ या ठिकाणी राहणारे केदारनाथ मंदिर समितीचे अधिकारी राजकुमार यांनी सांगितले, की महापुरात केदारनाथ मंदिर पुजारी निवास वाहून गेले. त्यांनी आणि ३०० भाविकांनी कसे तरी प्राण वाचविले. त्यांनी सांगितले की, बँकेचे कपाट आणि तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपये होते, महापुरात हे वाहून गेले. पाण्यावर तरंगणाऱ्या नोटा स्थानिक नागरिकांनी लूट नेल्या..
मृतांच्या दागिन्यांवर डल्ला
केदारनाथहून कसेबसे प्राण वाचवून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या धक्कादायक कहाण्यांनी मन सुन्न होत आहे. महापुरानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही नेपाळी नागरिकांसारखे दिसणारे लोक मृतदेहांवरील दागिन्यांवर डल्ला टाकत होते.
साधुच्या वेशात काही लोक मंदिराच्या आसपास लूटमार करत होते. हे लोक मृतांच्या शरीरावरील दागिने उतरवत होते आणि खिसे तसेच सामानातील पैशांवर डल्ला मारत होते. त्यामुळे बचाव कार्यात सामील असलेल्या नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांच्या जवांना या लोकांनाही हाताळावे लागत होते. आतापर्यंत या लुटऱ्यांकडून एक कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.