चंदीगड : जाट समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे आजही हरियाणात तणाव कायम असून राज्याच्या अनेक भागात हिंसाचार सुरुच आहे.
बसई धानकोट रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरला जमावाने आग लावली. सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-चंदीगड महामार्गावरील वाहतुकीची कोंडी केलीये. जिंदमध्येही आंदोलनकर्त्यांनी पेट्रोलपंपाची नासधूस केलीये.
या हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून १५४ जणांविरोधात एफआयआर दाखल झालेत. रोहतक, जिंद, भिवानी, झांज्जर, सोनीपत, हिस्सार या जिल्ह्यांमध्ये आजही परिस्थिती तणावपूर्ण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं असतानाही परिस्थिती मात्र आटोक्यात येत नाहीये..
आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समुदायानं सरु केलेल्या आंदोलनाचा फटका दिल्लीलाही बसलाय. जाट आंदोलकांनी राजधानी दिल्लीला पाणीपुरवठा करणा-या हरियाणातल्या मुनक कालव्याचे गेट जबरदस्तीने बंद केलेत. त्यामुळे राजधानी दिल्लीला होणारा पाणीपुरवठा ठप्प झालाय.
या पाणीटंचाईमुळे दिल्लीतील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आलीये.. तसेच परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्यात. दरम्यान सर्वांना पाण्याचं समान वितरण करण्यात येईल असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. तर राष्ट्रपती कार्यालय, सुरक्षा, अग्निशमन दल आणि रुग्णालयांना पाणी टंचाईतून वगळण्यात आलंय.
हे आंदोलन अधिक चिघळल्यास राजधानीत पाण्याचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी गृहमंत्रालय आणि हरयाणाच्या मंत्र्यांसोबत चर्चा सुरु असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलयं. पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचं आवाहन केल्याचंही ते म्हणाले.