जलईकट्टूच्या समर्थनार्थ आता सेलिब्रेटीही मैदानात

जलईकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. तमिळनाडूतले झाडून सगळे सेलिब्रिटीज जलईकट्टूच्या समर्थनात मैदानात उतरलेत.

Updated: Jan 20, 2017, 09:41 AM IST
जलईकट्टूच्या समर्थनार्थ आता सेलिब्रेटीही मैदानात title=

चेन्नई : जलईकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. तमिळनाडूतले झाडून सगळे सेलिब्रिटीज जलईकट्टूच्या समर्थनात मैदानात उतरलेत.

प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान, अभिनेता कमल हसन, विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर...एक ना अनेक दिग्गजांनी जलईकट्टूचं समर्थन केलंय. चेन्नईच्या मरिना बीचवर शांततामय आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. 

दरम्यान पंतप्रधानांशी चर्चेनंतर आज सकाळी मुख्यमंत्री पनीर सेल्वम यांनी जलईकट्टूवरची बंदी उठवण्यासाठी नवा अध्यादेश काढण्यात येईल असं आंदोलकांना सांगितलंय. अध्यादेशाचा मसूदा केंद्राकडे पाठवण्यात आला असून येत्या दोन दिवसात त्याला मंजूरी मिळाली की लगेच तो जारी करण्यात येईल असं पनीरसेल्वम यांनी म्हटलंय. 

जलईकट्टूच्या समर्थनार्थ आज एक दिवसाचा ए आर रहमान एक दिवसाचा उपवास करणार आहे. जलईकट्टूच्या खेळात बैलांवर अत्याचार होत असल्याचं सांगत प्राणीप्रेमी संघटनांनी केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयानं खेळावर बंदी घातली. 

या खेळाला जवळपास 2 हजार वर्षांचा इतिहास असल्याचा आंदोलकांचा दावा आहे. शिवाय खेळात बैलांविरोधात कुठलहीं क्रौर्य नसल्याचंही आंदोलकांचं म्हणणं आहे. वर्षांनुवर्षांचा इतिहास आणि प्राणीप्रेमी संघटनांचा अडेलतट्टू कारभार यामुळे आता जलईकट्टूचा प्रश्न तमिळ अस्मितेशी जोडण्यात आला असून सोशल मीडियावर त्यासंदर्भात जोरदार चर्चा झडतेय. 

शिवाय तमिळ अस्मितेवर घाला घातला जात असल्याचा दावा करून राज्यातल्या तरुणाईला आंदोलनात सामील होण्याचं आवाहनही करण्यात येतय. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसादही मिळतोय.. तमिळ सेलिब्रिटी आणि समाजातल्या महत्वाच्या व्यक्ती भूमिका घ्यायला कधीच मागे पुढे बघत नाहीत. त्याचाच प्रत्यय या आंदोलनातही येतोय.