देशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत

देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थाने भारतीय वायूसेनेत रुजू होणार आहेत.

Updated: Jul 1, 2016, 07:43 AM IST
देशी बनावटीचे पहिले लढाऊ विमान तेजस आजपासून भारतीय वायूसेनेत  title=

नवी दिल्ली : देशी बनावटीचे पहिले सर्वात हलके लढाऊ विमान तेजस आजपासून खऱ्या अर्थाने भारतीय वायूसेनेत रुजू होणार आहेत.

हिंदुस्तान अॅरोनॉटीकल्स लिमिटेडनं तयार केलेल्या या विमानाच्या स्कॉड्रनची पहिली दोन विमानं आज सेवेत सहभागी होतील. मिग २१ या रशियन बनावटीच्या विमानांची जागा घेण्यासाठी तेजस तयार करण्यात आलंय. एका स्कॉड्रनमध्ये साधारणतः २० विमाने असतात.  त्यापैकी पहिली दोन विमानं आज स्कॉड्रनमध्ये दाखल होणार आहेत. 

वायू दलामध्ये समावेश होतांना " स्क्वाड्रन ४५ " अशी तेजसच्या पहिल्या ताफ्याची ओळख असेल. तर २०१८ च्या मध्ये तेजसचे पूर्ण स्क्वाड्रन सज्ज झालेले असेल. १९८० च्या दशकांत मिग - २१ ची जागा भविष्यात घेतली जावी यासाठी स्वदेशी बनावट असेल अशा लढाऊ विमान बनवन्याचा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. 

२००१मध्ये या स्वदेशी लढाऊ विमानाने पहिल्यांदा हवेत झेप घेतली. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी या लढाऊ विमानाचे नामकरण तेजस असे केले.
तब्बल १५ वर्षांच्या चाचण्यानंतर हे लढाऊ विमान वायूदलात दाखल होत आहे.

तेजस  तयार  होण्यास उशीर झाल्यानेच, विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी भारत आता फ्रान्स देशाकडून राफेल विमान विकत घेत आहे. यामुळे अर्थात जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळेच हे तेजस विकसित करणा-या DRDO आणि HAL वर प्रचंड टिका झाली आहे. DRDO चा सर्वात  घसरलेला  प्रकल्प म्हणूनही तेजसची वेगळी ओळख आहे.

१९८३ पासून या तेजसवर काम सुरु असले तरी अजूनही फक्त ६०टक्के उपकरणे ही स्वदेशी बनावटीची आहेत. असं असलं तरी स्वबळावर लढाऊ विमान बनवण्याचा मोठा अनुभव भारताला मिळाला आहे. तो तेजसपेक्षा वरचढ़ विमान बनवतांना उपयोगी पडणार आहे. कारण जगात फारच कमी देश आहेत ज्यांनी स्वबळावर लढाऊ विमान बनवले आहे.