www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालायनं बुधवारी दलालीच्या आरोपांमध्ये फसल्यामुळे ‘अगस्ता वेस्टलँड’सोबत झालेला व्हीव्हीआयपी हेलीकॉप्टर सौदा रद्द केलाय. ३६०० करोडोंच्या या व्यवहारात कोणतीही अफरा-तफरी केली नाही किंवा कोणताही चुकीचा मार्ग अवलंबला नसल्याचं स्पष्टीकरण ‘अगस्ता वेस्टलँड’कडून याआधी देण्यात आलं होतं.
अगस्ता वेस्टलँड कंपनीच्या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कथित स्वरुपात कमीशनच्या रुपात देवाण-घेवाण झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर २०१० मध्ये हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. भारतीय हवाईदलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी आहेत. सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी सौपवण्यात आलीय.
संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान महमोहन सिंह यांची भेट घेतल्यानंतर हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं, संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटलंय. भारतानं या अँग्लो-इटालीयन कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. संरक्षण मंत्रालयानं गेल्या १० महिन्यांत अगस्ता वेस्टलँडला दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावलीय. कंपनीनं मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांच्या आरोपांना फेटाळून लावलंय. या प्रकरणाता कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना इटलीमध्ये अटक करण्यात आलीय.
या कराराद्वारे व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी १२ हेलीकॉप्टर्स खरेदी करण्यात येणार होते. यापैंकी अगस्ता वेस्टलँडकडून तीन हेलीकॉप्टर्स याअगोदरच विकत घेण्यात आलेत. परंतु, या करारासाठी लाच देण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या हेलीकॉप्टर्सच्या खरेदीवर सरकारनं बंदी घातली. हा करार रद्द केला तेव्हा भारतानं कराराच्या रकमेच्या ३० टक्के रक्कमेची पूर्तता केली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.