चेन्नई : अवकाशाचे अधिक चांगल्या पद्धतीने निरीक्षण करता यावे यासाठी चंद्रावर दुर्बिण उभारण्याबाबत भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) चाचपणी सुरू असल्याचे "इस्रो‘चे प्रमुख ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले आहे. एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना किरणकुमार यांनी म्हटलं की, 'चंद्रावर दुर्बिण उभारण्याबाबत जागतिक पातळीवरही चर्चा सुरू आहे. सध्या लेह येथे एक दुर्बिण कार्यरत असून, त्याचे प्रत्यक्ष कामकाज आणि नियंत्रण बंगळूरमधून केले जाते. याच पद्धतीने चंद्रावरही दुर्बिण उभारून कामकाज पृथ्वीवरून करता येणे शक्य आहे काय, याबाबत चाचपणी सुरू आहे. चंद्रावर कोणतेही वातावरण नसल्याने बदलत्या पृथ्वीप्रमाणे वातावरणाचा फटकाही दुर्बिणीला बसण्याची शक्यता नाही. हा एकप्रकारे फायदाच आहे. हा प्रयोग तूर्त चर्चेच्याच पातळीवर असला तरी ही शक्यता नाकारता येत नाही.'
चंद्रयान-2 या मोहिमेची तयारी सध्या सुरू असून पुढील वर्षाअखेरीस या मोहिमेला सुरवात होणार अशी अपेक्षा आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या नियंत्रणाबाबतच्या चाचण्या लवकरच घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य या मोहिमेलाही 2018 मध्ये सुरवात होणे अपेक्षित आहे. एका आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या मदतीने 'सेमी क्रायोजेनिक' इंजिनची निर्मिती करण्याचे प्रयत्न 'इस्रो'कडून सुरू आहेत.