नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बँकांमध्ये जवळपास १४ लाख कोटी जमा झाले आहेत. विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतोय की काळापैसा बाहेर येण्यासाठी केलेल्या नोटबंदीपासून काय मिळालं ?. सूत्रांच्या माहितीनुसार आता अशी माहिती येते आहे की, ४ लाख कोटींवर आयकर विभागाची नजर आहे जे बेहिशोबी असल्याची आयकर विभागाला शंका आहे.
आयकर विभागाने अशा अनेक व्यक्तींची चौकशी करणं सुरु केलं आहे. ज्यांच्या खात्यात २ लाखापेक्षा अधिक पैसा जमा झाला आहे अशा व्यक्तींवर आयकर विभागाची नजर आहे. अशातच जर या व्यक्तींकडे पैशाचा हिशोब नसेल तर अशा लोकांवर कारवाई करण्याची तयारी आयकर विभागाने केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात अनेक लोकांना याबाबत नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत 1.14 लाख खात्यांमध्ये ४ लाख कोटींहून अधिकची रक्कम जमा झाली आहे.
हा पैसा जनधनसह अशा अनेक खात्यांमध्ये टाकण्यात आला आहे. याआधी या खात्यांमध्ये मागील १-२ वर्षापासून कोणतंही ट्रान्जेक्शन झालं नव्हतं. १० नोव्हेंबरपासून १.७७ लाख लोकांनी २५ लाखपर्यंतचं कर्ज जुन्या नोटांनी फेडलं आहे.
आकर विभाग जमा रक्कम आणि त्याचा इनकम टॅक्स रिटर्न यांची चौकशी करत आहे. टॅक्स जमा करणारे लोकं मोठी रक्कम नाही ठेऊ शकत. अशा जवळपास ५ हजार लोकांना नोटीस देण्यात आली आहे.