www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कार्यालयातल्या सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक फणीश मूर्ती यांची कार्यालयातून दुसऱ्यांदा हकालपट्टी झालीय.
‘आयगेट्स’ या कंपनीचे प्रेसिडेंट आणि सीईओ असलेले मूर्ती यांची याच कारणासाठी यापूर्वी इन्फोसिसमधून हकालपट्टी झाली होती. ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ची पदवी, कोणत्याही मध्यमवर्गियाला हेवा वाटेल असा बायोडेटा असं असताना मूर्ती असं का वागले असतील? यामागे काय मानसिकता असेल? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं जन्माला आलेत. हा पैशाचा माज आहे की एखादा मानसिक आजार? याची चर्चा या निमित्तानं सुरू झालीय. स्वतः मूर्ती यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. चर्चेत असलेल्या स्त्रियांसोबत आपली जास्त जवळची मैत्री होती, हे मान्य करतानाच हा खंडणीचा प्रकार असल्याचा दावा मूर्ती यांनी केलाय.
फनिश मूर्ती यांचा जन्म बंगळूर इथल्या मल्लेश्वरममधला... मध्यमवर्गीय कुटुंबातले मूर्ती हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. आयआयटी आणि आयआयएम या मान्यताप्राप्त संस्थांतून त्यांनी पदवी मिळवली. नारायण मूर्तींनी स्थापलेल्या ‘इन्फोसिस’ या प्रसिद्ध कंपनीत `अदर मूर्ती` म्हणून ते प्रसिद्ध होते. परंतू २००२ साली लैंगिक छळाच्या आरोपाखाली इन्फोसिसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
मूर्ती यांची ही प्रकरणं अमेरिकेत घडली असली, तरी आपल्याकडेही असे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. `कॉर्पोरेट कल्चर`च्या नावाखाली यावर पांघरूण घालण्यापेक्षा असे प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाय शोधून काढणं गरजेचं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.