‘बलात्कारासाठी ममता किती चार्ज करणार?’

सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीसूर रेहमान यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘रेपसाठी त्या स्वत: किती चार्ज करणार’ असा प्रश्न विचारलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 28, 2012, 04:09 PM IST

www.24taas.com, कोलकाता
दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात एका विद्यार्थीनीवर झालेल्या गँगरेपच्या घटनेनंतर देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. तिथंच काही नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे या संतापात आणखीनच भर पडताना दिसतेय. आता, तर एका नेत्यानंच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना त्यांचा ‘रेट’ विचारलाय.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पूभ आणि पश्चिम बंगालचे काँग्रेसचे खासदार असलेल्या अभिजीत मुखर्जी यांनी आंदोलनकर्त्या महिलांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून लोकांचा संताप ओढवून घेतला होता. त्यानंतर सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनीसूर रेहमान यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘रेपसाठी त्या स्वत: किती चार्ज करणार’ असा प्रश्न विचारलाय.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच बलात्कार पीडित महिलांना २० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर टीका करताना रेहमान यांनी एका रॅलीमध्ये भाषणात हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘मी ममतांना विचारु इच्छितो की बलात्कारानंतर जर कुणाला २० हजार रुपये दिले जाणार असतील तर खुद्द ममतांचा रेपसाठी ‘रेट’ काय असेल. कुणी तुमच्यावर बलात्कार केला तर तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळायला हवी’ असं विधान रेहमान यांनी केलं.
मंत्रिमहोदयांच्या या वादग्रस्त विधानाननंतर तात्काळ तृणमूल काँग्रेसनं या विधानाचा कठोर शब्दांत निषेध केला. त्यामुळे आपली चूक सुधारत रेहमान लागलीच माफीदेखील मागून मोकळे झालेत. पण, आता तर पक्षाचे नेतेदेखील रेहमान यांच्यावर रुसलेत. अशी वक्तव्यं अजिबात सहन केली जाणार नाहीत, अशी तंबीच सीपीएमच्या ज्येष्ठ नेत्यांनी रेहमान यांना दिलीय. यावर आपण व्यक्तीगतरित्या ममता बॅनर्जी यांना टार्गेट केलं नव्हतं तर माझी टिपण्णी ही बलात्कार पीडितांच्या नुकसान भरपाईवर होती, असं स्पष्टीकरण रेहमान यांनी दिलंय.