मुंबई : मोदी सरकारनं घर खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या मध्यम वर्गासाठी एक खुशखबर दिलीय.
तुम्ही जर जानेवारी 2017 नंतर घर खरेदी केलं असेल किंवा घर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला गृहकर्जात दिलासा मिळू शकेल अशी सोय सरकारनं 'प्रधानमंत्री आवास योजने'त तरतूद केलीय. या योजनेद्वारे तुम्हाला मुंबई - पुण्यासारख्या शहरात घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या गृहकर्जावर तब्बल 3 ते 4 टक्के सूट मिळणार आहे.
पहिल्यांदाच घर खरेदी करत असाल तरच ही सूट तुम्हाला मिळू शकेल. ज्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाखांच्या दरम्यान आहे... त्यांना 9 ते 12 लाखांपर्यंतच्या कर्जावर तीन ते चार टक्क्यांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे गृहकर्जाचा हफ्ता तब्बल दोन हजारांनी कमी होऊ शकेल.
वेळेत आणि प्रामाणिकपणे आयकर भरून तसंच इतर मार्गांतून मध्यम वर्गाचा अर्थव्यवस्थेच्या वाढीला मोठा हातभार लागत असल्याचं यंदाच्या अर्थसंकल्पातही नमूद करण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आणि फायदेशीर ठरू शकेल, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलाय.