उत्तरखंड : विधानसभेत आज हरिश रावत यांच्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. यासाठी विधानसभेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मीडियाला या बहुमत चाचणी दरम्यान विधानसभेत उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. विधानसभेच्या आवारात कुणालाही कुठलही वाहनं घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
आमदार आणि विधानसभा अध्यक्षांनाही आवारात प्रवेश केल्यावर चालत विधानसभेच्या सभागृहात जावं लागणार आहे. विधानसभेच्या कामकाजचं संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. बहुमतचा ठराव, त्यावरील मतदान, आणि त्याचा निकाल या सर्वांचा एकत्रित अहवाल उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयासमोर एका बंद लिफाफ्यात सादर करण्यात येईल. तोपर्यंत विधानसभेत नेमकं काय झालं...हे गुलदस्त्यात राहणार आहे. सकाळी 11 ते 1 या काळात राज्यातली राष्ट्रपती राजवट तात्पुरती हटवण्यात येणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयने उत्तराखंड विधानसभेतल्या काँग्रेसच्या 9 बंडखोर उमेदवारांना आज होणाऱ्या बहुमत चाचणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई केली आहे.