www.24taas.com,नवी दिल्ली
वॉलमार्टने लॉबिंग प्रकरणी अमेरिकेतल्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचं वॉलमार्टनं स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारतात लॉबिंग करण्यासाठी वॉलमार्टने मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी लोकसभेत तर भाजपने राज्यसभेमध्ये जोरदार गोंधळ घातला. यावर पंतप्रधानांनीच खुलासा करावा, अशी मागणी भाजपने केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे काही काळ कामकाज तहकूब करावे लागले.
अमेरिकेतल्या कायद्यानुसार कंपन्यांना लॉबिंग विषयी केलेल्या खर्चाची दर तीन महिन्याला माहिती द्यावी लगाते. त्या नुसार वॉलमार्टने मागील तीन महिन्यात लॉबिंगसाठी १२५ कोटी रूपये खर्च केल्याची माहिती होती. संसदेत एफडीआयला मंजुरी मिळावी यासाठी वॉलमार्टने १२५ कोटी रूपयांचे लॉबिंग केल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आलाय.
अमेरिकेच्या परदेश विभागाच्या प्रवक्या व्हिक्टोरिया नुलैंड यांना लॉबिंग विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर, त्यांनी आरोप करणा-यांनाच हा प्रश्न विचारा असं सांगितलं. तर वॉलमार्ट या कंपनीला भारतात कोणत्या व्यक्ती, संस्थांची मदत मिळाली याची सविस्तर चौकशी करावी. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत वॉलमार्टला भारतात येण्यापासून रोखावे, अशी मागणीही रविशंकर प्रसाद यांनी केलेय.