मुंबई : उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी लिहिलेल्या 'चरैवेति चरैवेति' या पुस्तकावरुन नवा वाद निर्माण झालाय.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार अभिनेते गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत गोविंदा यांनी कुख्यात डॉन दाऊदची मदत घेतल्याचा खळबळजनक दावा राम नाईक यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
या दाव्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गोविंदा आणि दाउद यांच्यातील संबंधांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याप्रकरणी काँग्रेसने याप्रकरणी राम नाईक यांना आव्हान दिलंय. जर गोविंदा आणि दाउदच्या कनेक्शनची माहिती राम नाईक यांना होती तर ही माहिती लपवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल का कऱण्यात येऊ नये? अशी उलट विचारणा काँग्रेसने केलीय.
राम नाईकांच्या दाव्यामुळे त्यांच्याच सरकारची अडचण झाली आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचे सांगून सरकारने वेळ मारुन नेली.