नवी दिल्ली : देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे.
पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळतोय. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक ट्रस्ट आपल्या जवळील सोनं राष्ट्रीयकृत बॅंकेत जमा करण्यास इच्छुक आहे. सरकारची ही योजना अद्याप जाहीर झाली नाही. मात्र ही योजना फायद्याची आणि सुरक्षित असल्यास सिद्धिविनायक ट्रस्ट त्याला प्रतिसाद देईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिलीये.
शिर्डीतील साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनीही या योजनेबाबत उत्सुकता दर्शवलीये. मात्र सोन्यावरील व्याजदर हा महत्वाचा घटक असल्याचं ते म्हणालेत. सामान्य नागरिकही आपल्याकडील सोनं सरकारकडे जमा करु शकतात.
दरम्यान, काही हिंदू भाविकांनी या योजनेवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही मोठ्या भक्तीभावानं बाप्पाच्या चरणी सोन्याचं दान दिले आहे. त्यावर ट्रस्टनं व्याज खाणं अयोग्य असल्याचे काही भाविकांचे म्हणणे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.