श्रीनगर : श्रीनगर मधील नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एनआयटीत सुरू असलेल्या वादावर पडदा पडताना दिसत नाहीये. बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालायाच्या काही अधिकाऱ्यांनी एनआयटी कॅम्पसला भेट दिली. तेव्हा 'पोलिसांनी घेतलेला आमचा भारताचा झेंडा आम्हाला परत करा,' अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी या पथकाकडे केली आहे.
टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवानंतर काही स्थानिक काश्मिरी तरुणांनी जल्लोष करुन भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या इतर भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी भारताचा राष्ट्रध्वज या कॅम्पसमध्ये फडकवला आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.
यानंतर वातावरण तापले आणि दोन्ही गटातला वाद वाढला. मंगळवारी या संस्थेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅम्पसबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला. पण, त्याविरोधात शांततेने आंदोलन करताना पोलिसांनी आपल्यावर अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. पोलिसांनी मात्र या विद्यार्थ्यांनी आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप केला.
सोशल मीडियाद्वारे या आंदोलनाविषयी माहिती पसरवण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांची दखल घेतली. बुधवारी स्मृती इराणी यांच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी एक पथक रवाना केलं. सीआरपीएफचे जवान या संस्थेच्या कॅम्पसमध्ये तैनात करण्यात आले.
जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी या प्रकरणाला 'सौम्य लाठीचार्ज' म्हटल्याने विद्यार्थी आणखी संतापले. आता विद्यार्थ्यांनी पोलिसांनी त्यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्याची विनंती या पथकाला केली आहे. तसेच सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. काही विद्यार्थ्यांना घरी जायचे असल्याने त्यांची सोय करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच या संस्थेच्या आवारात भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पणे, शांतता बिघडू नये यासाठी या विद्यार्थ्यांना भारताचा तिरंगा फडकवण्याची परवानगी देऊ नये असे म्हटले आहे.