अहो आश्चर्यम... 'पुरूषा'नं दिला जुळ्या मुलांना जन्म!

मेरठमध्ये एक पुरूष चक्क बाळंत झालाय. त्यानं जुळ्या मुलांना जन्म दिलाय. हे कसं शक्य झालं, आश्चर्य वाटून घेऊ नका.

Updated: Feb 9, 2015, 11:11 PM IST
अहो आश्चर्यम... 'पुरूषा'नं दिला जुळ्या मुलांना जन्म! title=

मेरठ: मेरठमध्ये एक पुरूष चक्क बाळंत झालाय. त्यानं जुळ्या मुलांना जन्म दिलाय. हे कसं शक्य झालं, आश्चर्य वाटून घेऊ नका.

पुरूष बाळंत होत नाहीत, हा निसर्गनियम आहे. मात्र मेरठच्या डॉक्टरांनी चमत्कार घडवला. तब्बल अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी एका पुरूषाचं बाळंतपण केलं. त्याचं झालं असं की, गुडगावला राहणाऱ्या ममता नावाच्या महिलेला सात वर्षांपासून मुलबाळ नव्हतं. वांझोटेपणाचं जीणं जगणारी ममता उपचारांसाठी मेरठच्या जिंदाल टेस्ट ट्यूब सेंटरमध्ये आली. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की, ममता ही स्त्री नसून, चक्क पुरूष आहे. 

स्त्रियांमध्ये एक्सएक्स गुणसूत्रे असतात, तर पुरूषांमध्ये एक्सवाय. निसर्गाच्या विकृतीमुळं ममताच्या शरीरात एक्सवाय गुणसूत्रं होती. मात्र पुरूषाचं लिंग विकसित झालं नव्हतं. एक अविकसित गर्भाशय मात्र तिच्या शरीरात होतं. तिच्यात कोणतंही स्त्री हार्मोन नव्हतं की तिला मासिक पाळीही येत नव्हती.

डॉक्टरांपुढं मोठं आव्हान होतं. एखाद्या बाळाला जन्म देण्याएवढं गर्भाशय विकसित करण्यासाठी त्यांनी ममतावर हॉर्मोन्स आणि एंडोक्रिनल उपचार सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि तब्बल ३२ वर्षानंतर ममताला पहिल्यांदा मासिक पाळी आली. त्यानंतर ममताच्या पतीच्या वीर्यातून शुक्राणू घेऊन, टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानानं ते ममताच्या गर्भाशयात सोडण्यात आलं. या प्रक्रियेमध्ये अनंत अडचणी आल्या. मात्र डॉक्टरांच्या या महत्प्रयासांना फळ आलं. गेल्या ६ फेब्रुवारी रोजी ममतानं दोघा जुळ्या मुलांना जन्म दिला.

बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती आता उत्तम आहे. एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिल्यानंतर ममता समाधानी आहे.

एका पुरूष असलेल्या व्यक्तीला महिला बनवणं आणि तिच्यापोटी दोघा बाळांना जन्माला घालणं, याला चमत्कार नाही तर काय म्हणायचं...?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.