www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्याकडे जनरल मोटर्स इंडियाची ‘तवेरा’ ही गाडी असेल तर ही गाडी तुम्हाला कंपनीकडे परत पाठवावी लागणार आहे. जनरल मोटर्सनंच तसं आवाहन आपल्या ग्राहकांना केलंय. या गाड्यांमध्ये काही दोष आढळून आल्यानं २००५ ते २०१३ या काळात तयार करण्यात आलेल्या १.१४ लाख गाड्या दुरुस्तीसाठी परत मागविण्यात आल्यात.
‘तवेरा’ या गाडीत पर्यावरण आणि अन्य काही वैशिष्ट्यांमध्ये काही दोष आढळल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतलाय. `तवेरा` बीएस ३ (२.५ लिटर व्हर्जन) आणि बीएस ४ (२ लिटर व्हर्जन) या मोटारींमध्ये दोष असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. दुरुस्तीसाठी कार उत्पादक कंपन्यांचा आत्तापर्यंतचा हा देशातील सर्वात मोठा ‘रिकॉल’ आहे. वितरकांकडे गाडी कधी घेऊन जाता येईल, यासंबंधी कंपनी लवकरच माहिती देईल.
देशभरात कंपनीचे २८० डिलर्स आहेत. या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही. कंपनीनं यापूर्वीच म्हणजे चार जूनपासून ‘तवेरा’ च्या `बीएस ३` आणि दोन जुलैपासून `बीएस ४ व्हर्जन`ची विक्री आणि उत्पादन बंद केलंय. उत्पादन बंद करण्यामागे सुरक्षिततेचा कोणताही मुद्दा नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. पर्यावरणाच्या निकषांच्या पूर्ती करण्याबाबतचे समाधान कंपनीला मिळाले आहे आणि त्यासाठी नियामकांच्या मंजुरीची वाट कंपनी पाहत आहे . ते मिळाल्यानंतर कंपनी ` तवेरा ` चे उत्पादन आणि विक्री सुरू करणार आहे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.