गितीका आत्महत्या प्रकरणात कांडाला जामीन मंजूर

दिल्लीच्या एका न्यायालयानं हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ गोयल कांडा यांना मंगळवारी जामीन मंजून केलाय. परंतु, न्यायालयानं कांडाला दिल्ली सोडून जाण्यास मनाई केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 4, 2014, 07:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीच्या एका न्यायालयानं हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ गोयल कांडा यांना मंगळवारी जामीन मंजून केलाय. परंतु, न्यायालयानं कांडाला दिल्ली सोडून जाण्यास मनाई केलीय. कांडा एअरहोस्टेस गीतिका शर्मा हिचं शारिरीक शोषण आणि आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश यशवंत कुमार यांनी कांडाची जामीन याचिका मंजूर केलीय. न्यायालयानं कांडाला पाच लाखांचा खाजगी मुचलका आणि तेवढ्याच रक्कमेच्या दोन जामीन राशी भरण्याचे आदेश दिलेत. परवानगीविना कांडाला दिल्ली सोडण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच कांडाला पासपोर्ट जमा करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
पोलिसांनी सुनावणीदरम्यान, कांडाच्या जामीन याचिकेला विरोध केला. कांडा साक्षीदारांवर दबाव किंवा पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असा युक्तीवाद पोलिसांनी केला होता. कांडानं आपल्या आजारी पत्नीचं कारण पुढे करत १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाकडे जामीनअर्ज दाखल केला होता. १८ महिन्यांपासून आपण न्यायालयीन कोठडीत आहोत आणि या प्रकरणाची चौकशीही पूर्ण झालीय, असं कांडानं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.