www.24taas.com, झी मीडिया, हरियाणा
हरियाणाच्या कॅथल जिल्ह्यातील क्षेत्र पुंडरी या भागात रविवारी सकाळी एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तरुणीला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. यावेळी, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलंय. ही तरुणी मूळची महाराष्ट्रातली असल्याचं समोर येतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना एका अज्ञात इसमानं एक तरुणीचं प्रेत पुडंरीच्या पाई रोडवर पडलेलं असल्याचं फोनवर सांगितलं. सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या तरुणीची तपासणी केली तेव्हा ती जिवंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तिच्या शरीरावर जखमा होत्या.
पोलिसांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला कॅथलच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. तरुणीच्या मोबाईल फोनच्या माहितीच्या आधारे तिच्या घरी म्हणजेच महाराष्ट्रातील जळगावात कुटुंबीयांना याबाबतची सूचना दिलीय. ही तरुणी मुंबईमध्ये ब्यूटी पार्लर चालवते.
हॉस्पीटलच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. शुद्धीत आल्यानंतर कर्मचाऱ्यांसमोर या तरुणीनं आपली हकीगत कथन केली होती. आपल्या चुलत बहिणीसोबत एका तरुणाला भेटण्यासाठी ती हरियाणामध्ये दाखल झाली होती. एका तरुणानं प्रेमाचं नाटक रचत शनिवारी रात्र पुंडरीमध्ये आपल्या एका साथीदारासोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि सकाळी चालत्या बाईकवरून तिला फेकून दिलं.
सामूहिक बलात्काराची तक्रारच दाखल झाली नाही
पण, शुद्धीत आल्यानंतर पोलिसांनी मॅजिस्टेटसमोर या तरुणीचा जबाब नोंदवलाय. यावेळी तरुणीनं आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं साफ फेटाळून लावला. आपल्या अशोक नावाच्या एका मित्राला भेटण्यासाठी ही तरुणी करनालहून हाबडी गावात आली होती. परंतु, यावेळी अशोक तिला भेटला नाही. त्याला फोन करण्यासाठी तिच्या मोबाईलमध्ये पैसेदेखील कमी होते. त्यामुळे ती त्याला कॉल करू शकली नाही. यावेळी, तिला एका तरुणानं बाईकवर लिफ्ट दिली आणि करनालला सोडतो असं सांगितलं. स्पीड ब्रेकर आल्यानं आपण खाली पडल्याचं यावेळी तरुणीनं आपल्या जबाबात म्हटलंय.
संबंधीत तरुणीनं आपल्या जबाबात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदविण्यास नकार दिल्यानं तिनं दिलेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. त्यामुळे, सामूहिक बलात्काराची तक्रारच दाखल झाली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.