उंटीणीला भेटू दिले नाही, उंटाने घेतले दोघांचे प्राण

हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील खाबडा कला गावात रविवारी रात्री उंट दोरी तोडून शेजारच्या उंटीणीच्या गोठ्यात घुसला. उंटीणीच्या शेतकरी मालकाने जेव्हा उंटाला हाकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा उंट हिंसक झाला आणि त्याने दोघा शेतकऱ्यांचे प्राण घेतले तर एकाला जखमी केले. 

Updated: May 5, 2015, 06:49 PM IST
उंटीणीला भेटू दिले नाही, उंटाने घेतले दोघांचे प्राण title=

हिस्सार : हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील खाबडा कला गावात रविवारी रात्री उंट दोरी तोडून शेजारच्या उंटीणीच्या गोठ्यात घुसला. उंटीणीच्या शेतकरी मालकाने जेव्हा उंटाला हाकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा उंट हिंसक झाला आणि त्याने दोघा शेतकऱ्यांचे प्राण घेतले तर एकाला जखमी केले. 

महेंद्र (५५) आणि सुरजीत (४५) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. जखमी शेतकरी राजकुमार याच्यावर उपचार सुरू आहे. 

भाल सिंह गोदरा यांचा उंट रविवारी रात्री दोरी तोडून महेंद्र यांच्या घराबाहेर बनविलेल्या उंटीणीच्या गोठ्यात घुसला आणि उंटीणीला त्रास देऊ लागला. उंटीणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून महेंद्र आणि त्याचा भाऊ राजकुमार गोठ्यात गेले. त्यावेळी उंटाने त्यांना चावले. महेंद्रने काठीने उंटाला हुसकविण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हिंसक झाला .

उंटाने महेंद्र याना खाली पाडून त्यांना पायाने चिरडले. महेंद्र बेशुद्ध झाल्यानंतर उंट त्याच्या अंगावर चढून बसला. महेंद्रच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सुरजीत पळत आला. त्याने महेंद्रच्या अंगावर बसलेल्या उंटाला उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी उंटाने सुरजीत याला आपल्या दोन जबड्यात धरले आणि अनेकवेळा भिंतीवर आपटले. सुरजीत याचा घटनास्थळी मृत्यू झाला. 

या धुमाकुळानंतर गावातील नागरिकांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली लावून हिंसक उंटावर ताबा मिळविला. नंतर इंजेक्शन देऊन त्यालाही ठार केले. गंभीर जखमी झालेल्या महेंद्रला हॉस्पिटलमध्ये नेताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.