www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्या दिवशी आपलं धरणे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
नायब राज्यपालांशी अरविंद केजरीवाल यांनी फोनवर चर्चा केली, त्यानंतर आरोपी पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असल्याचं केजरीवाल यांना सांगण्यात आलं, यावरून अरविंद केजरीवाल यांनी आपलं धरणे आंदोलन मागे घेतलं आहे.
दिल्लीतील सागरपूरमध्ये एका मुलीला जाळण्यात आलं होतं, यातही आरोपींना अटक करण्यात पोलिस टाळाटाळ करत होते, असा आरोप केजरीवाल यांचा होता. या आरोपींनाही आता पोलिसांनी अटक केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी यानंतर आपलं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली, हा दिल्लीच्या लोकांचा विजय असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत आपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री : दुपारी ४ वाजता
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. रेलभवनजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.
पोलिसांनी लावलेले सुरक्षा कठडे काढण्याचा प्रयत्न आंदोलकांनी सुरू केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठी चार्ज केला आहे. आंदोलकांनी जमीनीवरून झोपून पोलिसांच्या कारवाईचा प्रतिकार केला आहे.
आपचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी युगांडाच्या महिलांवर वादग्रस्त रेड मारण्याचे आदेश दिले होते. हा आदेश न पाळणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी आपकडून करण्यात येत आहे.दिल्लीतील पोलिस हे केंद्र सरकारच्या नियंत्रणात येतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.