महिला पोलिसांना पुरुष सहकारी 'सेक्स वर्कर' म्हणतात...

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ड्युटीवर असलेल्या काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपले वरिष्ठ पुरुष अधिकारी आपला छळ करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

Updated: Aug 6, 2015, 12:44 PM IST
महिला पोलिसांना पुरुष सहकारी 'सेक्स वर्कर' म्हणतात...  title=

नागौर : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ड्युटीवर असलेल्या काही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपले वरिष्ठ पुरुष अधिकारी आपला छळ करत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

या महिला अधिकाऱ्यांनी डीजीपी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली तक्रार कळवलीय. 'या अधिकाऱ्यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांचे फोन नंबर्स त्या 'सेक्स वर्कर्स' आहेत असं सांगून जवळच्या भागांत वाटलेत.... असाही आरोप त्यांनी केलाय. तसंच पुरुष सहकारी आपल्याला अनोळखी नंबरवरून फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात... अशा गोष्टी बोलतात ज्या पत्रातही लिहिल्या जाऊ शकत नाहीत, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. 

आपलं खच्चीकरण करण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी पुरुष सहकाऱ्यांनी हा मार्ग वापरलाय... यामुळे, केवळ समाजातच नाही तर कुटुंबासमोरही आपला सन्मान हरवण्याची भीती या महिला पोलिसांना वाटतेय.

उल्लेखनीय म्हणजे, हे आरोप करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल्स काही महिन्यांपूर्वीच सेवेत भरती झाल्यात. या महिला पोलिसांची तक्रार आपल्याला मिळाल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय. यासंबंधी लवकरच हालचाली करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय. परंतु, अद्याप कोणत्याही महिला पोलिसानं समोर येऊन तक्रार केली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.  

राज्य महिला आयोगाच्या माजी प्रमुख लाड कुमारी जैन यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस दलात 'हायरारकी' खूप महत्त्वाची ठरते. आपल्या करिअरचं नुकसान करण्यासाठी कुणीही तयार होणार नाही... त्यामळे अशा छळाला सामोऱ्या जाणाऱ्या महिला पोलिसांनी एक ग्रुप करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडावं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.