खोटा ‘गँगरेप’ आरोपी निर्दोष; तरुणीवरच खटला

केवळ महिला सांगते म्हणून पोलिसांनी तिच्या तालावर नाचायचे. आपले कर्तव्य आणि जबाबदारी खुंटीला टांगून कोणाच्याही विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून टाकायचा अशी प्रथाच पडत चालली आहे,

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 3, 2013, 09:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केवळ महिला सांगते म्हणून पोलिसांनी तिच्या तालावर नाचायचे. आपले कर्तव्य आणि जबाबदारी खुंटीला टांगून कोणाच्याही विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून टाकायचा अशी प्रथाच पडत चालली आहे, असे फटकारे लगावत दिल्ली सत्र न्यायालयाने दोन तरुणांची ‘गँगरेप’च्या आरोपातून निर्दोष मुक्तता तर केलीच. शिवाय त्यांच्याविरोधात बलात्काराची खोटी साक्ष दिलेल्या तरुणीवर खटला भरण्याचा आदेशही दिला.
त्या तरुणीने नोव्हेंबर २०११ मध्ये आपल्यावर प्रीतम यादव आणि मनोजकुमार यादव या दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार केली होती. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनी त्या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध ‘गँगरेप’चा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्ह्यात नमूद केलेल्या कथित बलात्काराच्या दिवशी आणि त्या वेळेत मनोजकुमार हा आरोपी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत गुरगाव येथे होता. सुनावणीत हे उघड झाल्याने बलात्काराच्या आरोपाचे शस्त्र फिर्यादी तरुणीवरच उलटले.
त्या तरुणीवर न्यायालयात खोटी साक्ष आणि खोटे पुरावे दिल्याबद्दल आयपीसीच्या कलम १९३/१९६ अन्वये खटला भरण्यात यावा, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश वीरेंदर भट यांनी दिला.
महिलेचा जबाब ब्रह्मवाक्य नाही
महिलेचा जबाब म्हणजे काही ब्रह्मवाक्य नव्हे. अशा प्रकरणात पोलिसांनी संवेदनशीलता आणि सदसद्विवेकबुद्धी शाबूत राखून तपास केला पाहिजे. त्यासाठी पोलिसांना खास प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे न्यायाधीश वीरेंदर भट यांनी यावेळी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.