नवी दिल्ली : कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
ईपीएफओने २०३०पर्यंतचा कृती आराखडा तयार केला आहे. PF बरोबरच विमा संरक्षणांतर्गतही सर्व कामगार यावेत यासाठी ईपीएफओ प्रयत्न सुरु आहेत. ईपीएफओने तयार केलेल्या कृती आराखड्यांतर्गत भविष्यनिर्वाह निधीच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्याला सर्वंकष सामाजिक सुरक्षा संरक्षण (युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी कव्हरेज) देण्याचे ठरवण्यात आले आहे.
देशातील प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन आणि आयुर्विमा देण्याचाही ईपीएफओचा विचार असल्याचे संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा ईपीएफओचा मानस आहे.
कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम जमा करण्यास परवानगी देण्याच्या खासगी बँकांचा प्रस्ताव ईपीएफओच्या सल्लागार समितीने फेटाळून लावला आहे. अशा प्रकारची परवानगी देण्याची विनंती आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस आणि एचडीएफसी या बँकांनी केली होती.