www.24taas.com,नवी दिल्ली
महिलांना जेंव्हा संधी मिळालीय त्यावेळी त्यांनी स्वत:ला सिद्ध केलंय, असं सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला सलाम केला. स्त्री भ्रृण हत्या ही देशासमोरची मुख्य समस्या असल्याची चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
फिक्कीच्या महिला गटासमोर केलेल्या भाषणात मोदींनी गुजरातमधल्या महिलांच्या अनेक यशोगाथा उलगडल्या. गुजरामध्ये झालेल्या भूकंपानंतर घरांना महिलांचे नाव देण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामुळे लाखो घरं महिलांच्या नावावर झाली. राज्य सरकारनं महिलांना स्टॅम्प ड्यूटी माफ केली. सर्व महिला लोकप्रतिनिधींना निवडून देणा-या गावांना विशेष दर्जा गुजरात सरकारनं दिला असंही मोदींनी सांगितलं.
गुजराथच्या आदिवासी महिलांनी सुरु केलेले लिज्जत पापड हे आता पंचतारांकीत हॉटेलमध्येही लोकप्रिय आहे. तसंच जस्सूबेन या गुजराथी महिलेनं तयार केलेला पिझा हा जगप्रसिद्ध बनलाय, असं त्यांनी सांगितलं. भव्य गुजरातची निर्मिती हेच आपलं ध्येय असल्याचं मोदींनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.