www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ज्येष्ठ लेखक,पत्रकार आणि स्तंभलेखक खुशवंत सिंग यांच आज नवी दिल्लीत राहत्या घरी निधन झालं. इंग्रजीतले एक वाचकप्रिय लेखक म्हणून त्यांची ओळख होती. खुशवंत सिंह ९९ वर्षाचं समृद्ध आणि रंगतदार आयुष्य जगले. एक कलंदर मनमौजी आज आपल्यातून निघून गेलाय. कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारी त्यांची लेखणी आता शांत झाली आहे.
खुशवंत सिंग ही `बायलाईन` म्हणजे खुशवंत सिंगाच्या जगभर पसरलेल्या कोटयवधी वाचकांसाठी वाचनानंदाची पर्वणी होती. खुशवंत सिंग म्हणजे सच्चेपणा, वात्रपटपणा आणि बिनधास्तपणा यांचं खुमासदार कॉकटेल होतं.
पाकिस्तानमधील हदाली इथं २ फेब्रुवारी १९१५ ला खुशवंत सिंगांचा जन्म झाला. गेल्याच महिन्यात त्यांनी आपला ९९ वा वाढदिवस साजरा केला होता. फाळणीचं दु:ख मांडणारी खुशवंत सिंगांची `ट्रेन टू पाकिस्तान` ही कादंबरी गाजली. त्यांनी कथा, कादंबऱ्या, वृत्तपत्रांमध्ये स्तंभ असे विविध प्रकारचे लेखन केलं.
त्यांच्या पुस्तकांची यादी समृद्ध आहे... सेक्स-स्कॉच अॅन्ड स्कॉलरशिप, द पोट्रेट ऑफ ए लेडी, अ हिस्टरी ऑफ शिख्स, डेथ अॅट माय डोअरस्टेप, द सनसेट क्लब अशी कितीतरी पुस्तके गाजली. त्यांनी आत्मचरित्रानेही खळबळ माजली होती.
`इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया` या साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली, `हिंदुस्थान टाईम्स`चेही ते काळी काळ संपादक होते. त्यांच्या `विथ मॅलिस टूवर्डस वन अॅन्ड ऑल` स्तंभ खूप लोकप्रिय होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत खुशवंत तो लिहीत होते.
नवी दिल्लीच्या `सेंट स्टिफन्स` कॉलेज मधून पदवी घेतल्यानंतर लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्येही ते शिकले. वकिलीचेही त्यांनी शिक्षण घेतलं. काही काळ परराष्ट्र खात्यात नोकरी केली. पण, ते खरे रमले ते लेखन आणि पत्रकारितेतल्या शिस्तबद्ध आयुष्यात...
समाजाच्या विविध थरांमध्ये त्यांचा वावर होता. पंतप्रधानांपासून साध्या हमालापर्यंत ते सगळ्यांशी त्याच सहजपणे बोलत. त्यांची शैली बेधकड आणि बिनधास्त होती. अशी ही खुशवंत सिंग नावाची चालती आपल्या लेखणी, समोर कुणाचाही मुलाहिजा न बाळगणारा वाचकांना हसता हसता अंतर्मुख व्हायला लावणारा हा मस्त कलंदर हरफनमौला काळाच्या पडद्याआड गेलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.