www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अमेरिकेत अपमानित झालेल्या देवयानी खोब्रागडेंची युएनमध्ये कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. या बदलीमुळे त्यांना संपूर्ण राजनैतिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
या बदलीमुळं देवयानी यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेला भारताची परवानगी घ्यावी लागेल. अमेरिकेनं बिनशर्थ माफी मागावी अशी मागणी भारतानं केली होती. मात्र अमेरिकेनं मुजोरी कायम ठेवत नियमानुसार कारवाई केल्याचा दावा केलाय. त्यामुळं आता भारताच्या परराष्ट्र खात्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.
राज्यसभेमध्ये आज देवयानी खोब्रागडे यांचा अपमानाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून खोब्रागडे यांचा अपमानाचा निषेध करण्यात आला. भारताचे परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शिद यांनी देवयानी खोब्रागडे प्रकरणी अमेरिकेला राज्यसभेत कठोर शब्दात इशारा दिलाय. यावेळी कठोर शब्दांइतकीच कठोर कारवाईची आवश्यकता आहे असं त्यांनी विधान केलं.
दुतावास अधिकारी देवयानी खोब्रागडेंची अमेरिकेत अंगझडती घेण्यात आली. या अपमानास्पद प्रकारानंतर त्यांना रडूच कोसळलं. आपल्याला अट्टल गुन्हेगारांसारखी वागणूक देण्यात आल्याची व्यथा देवयानी खोब्रागडेंनीच आपल्या आयएफएस सहका-यांना इ-मेल पाठवून कळवली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.