दिल्ली गँगरेप : दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील सगळ्या म्हणजे सहा आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 29, 2012, 07:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या २३ वर्षीय विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर या प्रकरणातील सगळ्या म्हणजे सहा आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. ३ जानेवारी रोजी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
या आरोपींना कठोरातील कठोर सजा मिळावी यासाठी आम्ही आमच्याकडून होतील तेवढे प्रयत्न करणार आहोत, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. ‘आम्ही ३ जानेवारी २०१३ रोजी आरोपपत्र दाखल होण्याची आशा करतोय. या प्रकरणात आरोपींवर बलात्काराबरोबरच कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. फास्ट ट्रॅक कोर्टात दररोज सुनावनी होण्यासाठी एका विशेष लोक अभियोजकाची नियुक्ती करण्यात आलीय’ अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.
पोलिसांनी या आरोपींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), २०१ (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न), ३६५ (अपहरण), ३७६ – २ जी (सामूहिक बलात्कार), ३७७ (असामान्य अपराध), ३९४ (जखमी करणं) आणि ३४ नुसार गुन्ह्याची नोंद केली होती. त्यामध्ये आता कलम ३०२ (हत्या) नुसार गुन्ह्याची नोंद केलीय.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपी, बस चालक राम सिंह, त्याचा भाऊ मुकेश, अक्षय ठाकूर, पवन आणि विनय यांना अटक केलीय. पकडल्या गेलेल्या सहाव्या आरोपीनं आपण अल्पवयीन असल्याचा दावा केलाय. या आरोपीचं नेमकं वय कळावं यासाठी पोलिसांनी या आरोपीच्या हाडांच्या तपासणीची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे.