www.24taas.com,मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर दिल्लीतल्या नेत्यांनी जोरदार टीका केलीय. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केलीय. देशात कुणीही कुठंही जाऊ शकतो, असं सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी माध्यमांना धमकावणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलंय.
धमकावणं हे लोकशाहीच्या तत्वात बसत नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस चोख उत्तर देईल असा इशारा तारिक अन्वय यांनी दिलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारी नेत्यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला होता. मुंबईतले आरोपी युपी आणि बिहारमध्येच का जातात असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. बिहारमध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारांना आश्रय मिळतो, असा आरोपही राज ठाकरेंनी केला होता.
याचबरोबर गृहमंत्री यांना कसलीच माहिती नसते, असं राज ठाकरे म्हणाले. दिग्विजय सिंग यांना‘कार्टं’ म्हणतं ते काँग्रेसचं बुजगावणं असून काँग्रेसनं त्यांना केवळ शिवीगाळ करण्यासाठी ठेवल्याचा घणाघात राज यांनी केला होता.
तसंच हिंदी चॅनेल्स मला हेतुपुरस्सर टार्गेट करतात असं सांगत त्यांनी माझ्यावरील टीकेचा खेळ थांबवला नाही तर मीच त्यांचा महाराष्ट्रातला खेळ थांबवेल असा सज्जड इशाराही त्यांनी दिला होता.