www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली बलात्काराच्या घटनेनं सगळा देश ढवळून काढला. हा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालाय. त्याचवेळी या दुर्दैवी तरुणीनं दिलेल्या शेवटच्या परीक्षेचे गुण समजले आणि तिच्या यशानं पुन्हा एकदा अनेकांचे डोळे पाणावलेत.
‘ती’ धैर्यशील तरुणी अभ्यासातही हुषार असल्याचं लक्षात आलंय. डेहराडूनच्या संस्थेतून ती फिजिओथेरपी करत होती. यामध्ये ११०० पैकी तब्बल ८०० गुण तिनं मिळवलेत... म्हणजेच ७३ टक्के... आज ती सुखरुप असती, तर हे मार्क्स बघून तिच्या चेहऱ्यावर कसं हास्य पसरलं असतं, या विचारानं तिच्या आई-वडिलांना गहीवरून मात्र गहिवरून येतंय.
‘ती खूप जिद्दी आणि कष्टाळू मुलगी होती... फिजिओथेरिपीमध्ये तिला आपलं करिअर करायचं होतं... आणि त्यासाठीच ती खूप मेहनत घेत होती’ असं तिला शिकवणाऱ्या शिक्षकांनी म्हटलंय. त्यामुळेच ‘ती’ शिकत असलेल्या साई इन्सिट्यूटच्या मॅनेजमेंटनं तिच्या कुटुंबाला १ लाख ८० हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलाय. ही तिच्या कुटुंबियांनी तिच्या शिक्षणासाठी म्हणजेच पुढच्या चार वर्षांची भरलेली फी आहे. देहरादूनमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात हे पैसे तिच्या कुटुंबीयांना परत केले जातील, परंतू, तिच्या कुटुंबीयांनी हे पैसे घेतले नाहीत तर ते गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येतील, असं इन्स्टिट्यूटच्या वतीनं सांगण्यात आलंय.