www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवत ज्युवेनाईल कोर्टानं तीन वर्षाची शिक्षा सुनावलीय. `निर्भया`वर क्रूरपणे बलात्कार करणाऱ्या `सहाव्या` आरोपीचं वय न पाहता, त्यालाही सर्वसामान्य आरोपींप्रमाणं शिक्षा द्यावी, या याचिकेला सुप्रीम कोर्टानं फेटाळलं होतं. त्यानंतर शनिवारी हा निर्णय देण्यात आला.
मागील वर्षी १६ डिसेंबरला राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारानं संपूर्ण देश हादरला होता. पॅरामेडिकलच्या एका विद्यार्थिनीवर सहा नराधमांनी बलात्कार करून तिला धावत्या बसबाहेर फेकून दिलं होतं. या प्रकरणातील सर्व आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी राम सिंहनं ११ मार्च रोजी तिहार तुरुंगात गळफास घेतला होता.
त्यामुळं उर्वरित पाच आरोपींना काय शिक्षा होणार, याकडे सरळ्यांचच लक्ष लागलं होतं. परंतु, `निर्भया`वरील बलात्कार प्रकरणी एक आरोपी १८ वर्षाखालील असल्यानं आणि `अल्पवयीन`चं वय १८ वरून १६ करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानं, त्याचा निकाल ज्युवेनाईल कोर्टात झाला. दरम्यान, आरोपीचे वकील हे ज्युवेनाईल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.